माणिकडोहच्या रेस्क्यू टीमची कार्यवाही ः नागरगावात ऊसतोडणी करताना आढळली
जुन्नर/न्हावरे (वार्ताहर)- ऊसतोडणी सुरू असताना शेतात सापडलेली तीन बिबट्यांची पिल्ले पुन्हा त्यांच्या आईकडे सोपविण्यात आली. माणिकडोह (ता. जुन्नर) रेस्क्यू टीमच्या डॉ. अजय देशमुख व सहकाऱ्यांनी हे रीयुनियन घडवून आणले आहे.
नागरगांव (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 19) ऊसतोडणीचे काम सुरू असताना शेतकरी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात कामगारांना तीन बिबट्याची पिल्ले आढळली होती. या तीन पिल्लांमध्ये एक नर व दोन मादी होत्या. उसाचे शेत हे बिबट्याचे नैसर्गिक अधिवास बनत चालल्याचे धक्कादायक वास्तव आहे. आता सर्वत्र ऊसतोडणी सुरू झाली असून बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचे चित्र आहे. या घटनेतील धुमाळ यांनी पिल्ले आढळताच तातडीने शिरूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी तातडीने माणिकडोह रेस्क्यू टीमला बोलावून घेतले.
माणिकडोहचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी या तीनही पिल्लांना मायक्रोचिप लावून पुन्हा आईच्या कुशीत सोपविले. यावेळी पिल्लांची प्राथमिक तपासणी करून ज्याठिकाणी ऊसतोड कामगारांना पिल्ले आढळली होती. तेथे एका छोट्या खोक्यात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले. साधारण पाचशे मीटर अंतरावर आडोशाला लपलेली रेस्क्यू टीम पिल्लांची आई येण्याची वाट पहात होती. सायंकाळी 6.43 वाजता पहिल्या पिल्लाला मादी घेऊन गेली. पुन्हा अर्ध्या तासाने येऊन तिने उर्वरित दोन्ही पिल्लांना सुरक्षितस्थळी घेऊन गेली. पिल्लं परत मिळाल्यामुळे आई चिडून हल्ले करणार नाही, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
73 पिल्लांची घडवली आईशी भेट
आत्तापर्यंत माणिकडोह बिबट बचाव केंद्राच्या धाडसी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 73 बिबट पिल्ले आईच्या कुशीत सोपविल्याचे काम पार पाडले आहे. या रियुनियन ऑपरेशनमध्ये वाईल्ड लाईफ एसओएसचे आकाश डोळस, वैभव नेहरकर, वनविभागाचे प्रविण क्षीरसागर, भानुदास शिंदे आदी कर्मचाऱ्यांसह शिरूर गावकरी रेस्क्यू टीमचे सुधीर चितळे, शरद गदाबे, सुनील कळसकर, गोविंद शेलार व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.