स्पा सेंटरकडून खंडणी मागणारे ‘ते’ तीन तोतया पत्रकार जेरबंद

पुणे(प्रतिनिधी) – “स्पा सेंटर सुरू ठेवायचा असेल, तर दरमहा 15 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’ असे सांगत खंडणी घेणाऱ्या तीन तोतया पत्रकारांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई कोरेगाव पार्क परिसरात करण्यात आली. 

विशाल कचरू पायाळ (28, रा. कदमवाक वस्ती), सनी तानाजी ताकपेरे (27 , रा. घोरपडे वस्ती), पंकेश राजू जाधव (35 रा. कोंढवा खुर्द) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार मंगेश डोंगरखोस हे स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर आहेत. सेंटरच्या मालक नूतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या आहेत. विशाल पायाळ हा एका वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. दि.16 जानेवारी रोजी तो साथीदारासह स्पा सेंटरला आहे. तेथे त्याने “माझ्या परवानगीशिवाय स्पा सुरू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा 15 हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल,’ असे सांगत दांडके बाळगणारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली.

सोमवारी त्याने फोन करुन “दुपारी पैसे घेण्यासाठी येतो,’ असे सांगितले. त्यामुळे स्पा मालक यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी इतर अधिकारी, पंचांना बोलावून स्पा सेंटर येथे सापळा रचला. विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले असता, मॅनेजरकडून 15 हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

दोघांकडे ओळखपत्रे सापडली …

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही एका वृत्तपत्रात काम करत असल्याचे सांगतात. त्यांच्यापैकी दोघांकडे ओळखपत्रे सापडली आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ते मागील काही दिवस कोरेगाव पार्कमधील प्रत्येक स्पा सेंटरमध्ये जाऊन महिना 15 हजार रुपयांची मागणी करत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.