इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीटीआयचे ज्येष्ठ नेते महमूद कुरेशी यांना पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने पीटीआय नेते जमशेद चीमा आणि त्यांची पत्नी मुसरत चीमा यांनाही नजरकैदेत ठेवले आहे.
रावळपिंडीच्या आयुक्तांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहकारी नेत्यांना अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत. रावळपिंडीच्या आयुक्तांनी पाकिस्तानच्या सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या कलमांतर्गत नजरकैदेचे आदेश दिले आहेत. माजी मंत्री कुरेशी आणि पीटीआय नेते जमशेद चीमा आणि त्यांची पत्नी मुसरत यांना 15 दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.
रावळपिंडीच्या अदियाली तुरुंगातून सुटल्यानंतर काही मिनिटांनी कुरेशीला पुन्हा अटक करण्यात आली. लगेचच मुसरत चीमालाही अटक करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले की, मी अजूनही पीटीआयचा एक भाग आहे आणि राहणार आहे. पीटीआयच्या उपाध्यक्षा शिरीन मजारी यांनी याआधी आपण पक्ष आणि राजकारण सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही तासांनी त्यांनी पक्षातच राहण्याची घोषणा केली.
कुरेशी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते की, ते कामगारांना आंदोलनासाठी भडकवणार नाहीत. यानंतर हायकोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. पंजाब आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतात दंगली आणि जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कुरेशी यांना अटक केली होती.
खदिजा शाह यांनाही अटक
पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफची (पीटीआय) समर्थक फॅशन डिझायनर खादिजा शाह हिला जिना हाऊस हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी 9 मे रोजी जिना हाऊसवर हल्ला केला होता. पंजाब पोलिसांनी सांगितले की, लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस हल्ल्यातील मुख्य संशयित खादिजा शाह हिला ताब्यात घेण्यात आले आहे. खदिजा शाह यांनी शरणागती पत्करली नाही. यापूर्वी स्वत: शरण येण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तिच्या पतीसह इतर कुटुंबीयांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
==================