पुणे – ‘झिका’ विषाणूच्या तपासणी अहवालात आणखी तीन जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, तीनही रुग्ण गर्भवती माता आहेत. शहरातील “झिका’ बाधित रूग्णसंख्या 9 वर पोहचली आहे. शहरातील ही वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.
शहरात गेल्या आठवडाभरात 9 रुग्णांना झिकाची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले. या आधी वारजे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एरंडवणे, मुंढवा परिसर आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत डहाणुकर काॅलनी परिसरात एकूण 6 रुग्णांची नोंद झाली.
त्यानंतर आरोग्य विभागाकडून या परिसरासह अन्य क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वेक्षणाला सुरुवात केली आणि संशयीत व्यक्तींची तपासणी करून नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात येत आहे. त्यानुसार आज नव्याने पाषाण औंध परिसर, आंबेगाव बुद्रुक आणि मुंढवा परिसरात तीन बाधित महिला आढळल्या.
त्यातील एका महिलेला कोणतीही लक्षणे नसून, एकीला डोकेदुखी तर दुसरीला ताप, सांधेदुखी आणि लाल चट्टे अशी लक्षणे आहेत. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरात डास उत्पत्तीची ठिकाणी शोधून ती नष्ट केली जात. औषध फवावरणीसह तेथील संशयित नागरिक, लहान मुले आणि गर्भवती मातांची तपासणी केली जात आहे.
“एडिस प्रजातीच्या डासांची उत्पत्ती ठिकाणे सापडत आहे. ती नष्ट करणे, औषध फवारणी सुरू आहे. पाणी साचलेल्या जागा मालकांना दंडही केला जातो. मात्र, ही उत्पत्ती होवूच नये यासाठी इमारतीमधील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा.” – डाॅ. कल्पना बळिवंत, आरोग्य प्रमुख, पुणे मनपा.