पौड, लोणीकंद, शिरूरमधील कर्मचाऱ्यांचा समावेश
लोणी काळभोर- अवैध धंद्यावर प्रभावीपणे कायदेशीर कारवाईसाठी बीट इंचार्ज म्हणून नियुक्त केलेल्या 3 पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्य बजावण्यात गंभीर स्वरुपाची कसूरी केल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तिघांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक पाटील यांच्या कारवाईचा कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील पौंड, लोणीकंद व शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार अड्ड्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बीट इंचार्ज म्हणून पोलीस हवालदार एस. एस. राक्षे, कर्डिले, पोलीस नाईक ए. एस. ओहोळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यामध्ये अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाईची मोहीम तिव्र केली होती. त्यामध्ये पौड, लोणीकंद व शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून ते तात्काळ नष्ट करण्यात आले. तिघांना निलंबित केले असून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.