सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)
राज्य पोलीस दलातील डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या झाल्यानंतर शुक्रवारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट बाहेर पडले.
त्यात सातारा जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याची मुंबईला तर बाहेरून साताऱ्याला तीन नवे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले आहेत.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर डीसीपी,डीवायएसपी,एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर शुक्रवारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
यामध्ये सातारा पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक दीपक साबळे यांची मुंबई शहरला बदली झाली. तर पुणे ग्रामीण पोलीस दलातून हरिभाऊ राजळे, पोलीस प्रशिक्षण केंद्र तासगांव येथून बाळू अलदार, सांगली पोलीस दलातून राजेंद्र गायकवाड या अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे.
जिल्ह्यात आलेले हे अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक, मोटर परिवहन, वायरलेस विभागासाठी आल्याची माहिती आहे. दि.30 रोजी रात्रीपर्यंत बाकी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट बाहेर येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.