पुणे : तरुणीला मराठी भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन तिघांनी मराठी भाषेतून पत्र तयार केले. पत्र व्यवहार करण्यासाठी संमतीपत्र असल्याचे सांगून कुलमुख्त्यार पत्रावर सही करुन 1 कोटी रुपयांच्या मिळकतीचा व्यवहार करुन फसवणूक केली.
याप्रकरणी घोरपडी गावातील 27 वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार हिम्मत कवडे (रा. श्रीनाथनगर, घोरपडी), पॉल पिटर फ्लेरो (रा. घोरपडी) आणि सुरेश त्रिंबक पाळवदे (रा. थिटेवस्ती, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 24 एप्रिल ते ऑगस्ट 2024 दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन फिर्यादीच्या मिळकतीचा व्यवहार करुन देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांचा मराठी भाषेविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन, दिशाभूल करुन पत्रव्यवहार करण्यासाठी संमतीपत्र घेतो, असे सांगून कुलमुख्त्यार पत्र घेतले.
फिर्यादीच्या मालकीची घोरपडीतील अंदाजे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या मिळकतीचा बनावट दस्त बनविला. त्यावर फिर्यादी यांचा कुलमुख्त्यार पत्रावरील फोटोवरुन कलर फोटो काढला. बनावट सही व अंगठा करुन या मिळकतीचा व्यवहार केला. त्याचा कोणताही लाभ फिर्यादीला न देता फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
संबंधीत तरुणी कर्नाटक येथे शेती करते. हे घर तिच्या आईवडिलांनी घेतले होते. त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाल्यावर हे घर तिच्या नावावर झाले. तिने तेथे भाडेकरु ठेवले होते. मात्र भाडे कमी मिळत असल्याने तिने भाडेकरुंना घर खाली करण्यास सांगितले. मात्र ते घर खाली करत नव्हते.
तेव्हा नातेवाईक फ्लेरो यांनी ओळखीच्या कवडे मार्फत घर खाली करुन देतो असे सांगितले. यानंतर पोलीस ठाण्यात भाडेकरुविरुध्द तक्रार ही देण्यास सांगितले. यादरम्यान तिघांनी मिळून मिळकतीची काही कागदपत्रे तयार करायची असल्याचे सांगत कुलमुखत्यार पत्रावर सह्या घेतल्या होत्या.