नागठाणे – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ (ता. सातारा) येथील सेवा रस्त्यानजीक असलेले बॅंकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चौघांपैकी मंगेश मोहन मुंडे (वय 21, मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड, हल्ली इंदोली, ता. कराड), राजेंद्र अशोक चव्हाण (वय 27, मूळ रा. चव्हाणवाडी, ता.कराड, हल्ली साळशिरंबे, ता. कराड) व अनिल संजय देसाई (वय 25, रा. उंब्रज, ता. कराड) या संशयितांना बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाटण येथून शिताफीने अटक केली. उर्वरित संशयिताचा शोध सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामार्गावर काशीळ येथील सेवारस्त्यानजीक असलेले बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन चार चोरट्यांनी 28 जानेवारीला पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. रात्रगस्तीवर असलेल्या बोरगाव पोलिसांची गाडी आल्याने चोरटे पळून गेले होते. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सापडले होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. त्यापैकी तीन संशयित पाटण न्यायालयात येणार असल्याचे पोलिसांना समजले. सपोनि चंद्रकांत माळी, सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजू शिखरे, किरण निकम, विशाल जाधव यांनी शनिवारी दुपारी पाटण न्यायालयात पाळत ठेवली. मंगेश मुंडे, राजेंद्र चव्हाण व अनिल देसाई हे सायंकाळी न्यायालयातून बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल तपास करत आहेत.