गाझीयाबाद – गाझीयाबाद मध्ये स्मशान भूमीतील छत कोसळून तेथे अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तींमधील 24 जण ठार झाल्याचा प्रकार काल घडला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी आज नगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुरादनगर नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निहारिका सिंग, कनिष्ट अभियंते चंद्रपाल आणि सुपरवायझर अशिष यांचा समावेश आहे. स्मशानभूमीचे हे छत बांधणारा कंत्राटदार अजय त्यागी मात्र अजून फरारी असून त्याचा शोध जारी आहे.
दरम्यान, कालच्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी आज मुरादनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. कालच्या घटनेत अन्य 17 जण जखमी झाले असून त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान राज्य सरकारने या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाखांची मदत घोषित केली आहे.