पिरंगुट- सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर तीन जणांवर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिरंगुट, कासारआंबोली आणि शिंदेवाडी येथील युवकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. पिरंगुटमधील शाहरुख इरफान शेख (वय 22), कासारआंबोली येथील शुभम श्रीकांत सुतार (वय 21) आणि ऋषिकेश राजेंद्र शेडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालादर बाबा शिंदे, संतोष कुंभार, पोलीस शिपाई मोरे, पोलीस नाईक बनसोडे हे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान काही लोक मोबाइलवर आक्षेपार्ह असा मजकूर ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे स्टेटस ठेवले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ही कारवाई केली. सोशल मिडीयाचा वापर जपून करा. दोन समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असे संदेश पाठवू नका. अन्यथा अशाच प्रकारे गुन्हे दाखल होतील, असे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.