वांग नदीत वाहून जाणाऱ्या चौघांपैकी तिघांना वाचविले

ढेबेवाडी/सणबूर – ढेबेवाडीनजीक वांग नदीचे पात्र ओलांडत असताना तीन चिमुकल्यांसह आजोबा वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यापैकी आजोबा व दोन मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र एक मुलगी वाहून गेल्याने तीचा शोध सुरु होता.

चिमुकल्यांसह त्यांचे आजोबा हे सणबूर (ता. पाटण) येथील रहिवाशी आहेत. या घटनेत वाचविण्यात आलेल्या दोन चिमुकल्यांसह आजोबा हे जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी, सणबूर येथील शंकर रामचंद्र साठे (वय 62) हे स्वरांजली आनंदा साठे (वय 10), श्रावणी शिवाजी साठे (वय 10), क्षितीजा शिवाजी साठे (वय 12) या तीन नातींसोबत कुठरे (ता. पाटण) येथे मुलीकडे गेले होते. रात्री मुक्काम करुन गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ते सणबूरकडे निघाले. यावेळी नदीपात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी ओलांडून जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या तीन नातींसह शंकर साठे नदीपात्र ओलांडून जाऊ लागले.

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शंकर साठे हे आपल्या तीनही नातींसह प्रवाहात वाहून गेले. सुमारे पाचशे मीटर अंतरावर काही स्थानिक नागरीक आंघोळीसाठी तसेच गोधड्या धुण्यासाठी आले होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि विलंब न करता तातडीने प्रवाहात उड्या मारुन या चौघांनाही वाचविण्याचा प्रयत्ना केला. यावेळी दोन मुली आणि शंकर साठे यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र एक मुलगी पाण्यात कुठेच आढळली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.