एका म्होरक्याचाही समावेश
श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारले गेलेले दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते.
शोपियॉंच्या वच्छी भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्याआधारे सुरक्षा जवानांनी विशेष मोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी वेढले. शरण येण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात आदिल अहमद, वासीम वनी आणि जहांगीर हे दहशतवादी ठार झाले. आदिल हा काही काळ विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होता. मात्र, 2018 मध्ये पोलीस दल सोडून तो दहशतवादी बनला. चकमकीत ठार झालेला वासीम हा हिज्बुलच्या म्होरक्यांपैकी एक होता. शोपियॉंमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. दक्षिण काश्मीरात हिज्बुलचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ताज्या घडामोडीचे महत्व वाढले आहे.