सातारा – बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र वय (२४ वर्षे ) या दोघांना सर्दी व खोकला असल्याने त्यांना शनिवारी (दि. २१) मार्च रोजी रात्री ११ वाजता जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
तसेच कतार येथून प्रवास करुन आलेल्या २४ वर्षीय युवकाला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री १ वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले. यापूर्वी काल दुपारी १२ वाजता चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री १० वाजता दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले आहे. असे एकूण रात्री उशिरापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले आहे.
वरील पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील ‘एनआयव्ही’ कडे पाठविण्यात आले असून त्यांना कोरोना अनुमानित लक्षणे असल्याने त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.