सातारा रस्त्यावरील बीआरटीची अवस्था बिकट; अन्य तीन रस्त्यांसाठीचा प्रस्ताव
पुणे – सातारा रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पाची अवस्था बिकट असतानाही, येत्या वर्षात शहरातील अन्य तीन रस्त्यांवरील बीआरटीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे पुढील काळामध्ये वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्यासह तीन रस्त्यांचा बळी जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता आणि पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गावर 15 किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग प्रस्तावित असून, महापालिकेच्या सन 2020-21 च्या अंदाजपत्रकात आणखी 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर स्वारगेट ते कात्रज या सातारा रस्त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बीआरटी मार्गासाठी सन 2020-21 च्य अंदाजपत्रकात 7 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि नगररस्ता या रस्त्यांवर एकूण सुमारे 16 किमी लांबीकरता ही योजना कार्यान्वित केली आहे. मात्र, बसेससाठी स्वतंत्र मार्ग असूनदेखील या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. सिमला चौक ते राजीव गांधी पूल (औंध) येथील 6.5 किमी लांबीच्या प्रस्तावांपैकी विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पुलादरम्यानचे 3.2 किमी लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रीज या रस्त्यांवर सुमारे 5.70 किमी लांबीपैकी पाटील इस्टेट जंक्शन ते रेंजहिल चौकदरम्यान 2 किमी लांबीच्या भागामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेंजहिल चौक ते खडकी रेल्वे स्टेशन हा मार्ग खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित असून, याबाबत आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती अंदाजपत्रकात दिली आहे.
यासह पाटील इस्टेट जंक्शन पूल ते संगमवाडी गावठाणदरम्यान रस्ता रुंदीमधील जागा ताब्यात मिळाल्यानंतर रुंदीकरणाचे काम होणार आहे. यानंतर बीआरटीएस योजनेंतर्गत वाहतूक विभागाशी समन्वय साधून बसथांबे बांधणी आणि कॉरिडॉर तयार करण्याचे उर्वरित काम हाती घेण्यात येणार असल्याचेदेखील नमूद केले आहे.
बीआरटी मार्गावरील बॅरिकेड, सिमेंट ब्लॉक गायब
शहरातील बसेस सुरळीत आणि सुरक्षित धावण्यासाठी प्रशासनाने “बीआरटी’ मार्गाचा घाट घातला; परंतु बंद बीआरटी मार्गांच्या बरोबरीने या मार्गांवरील साहित्यच गायब होत आहे. बसेससाठी मार्ग निश्चित करताना प्रशासनाने “बॅरिकेडिंग’ आणि “सिमेंट ब्लॉक’ लावण्यात येतात. मात्र, अनेक ठिकाणी हे ब्लॉकचीच चोरी झाली आहे. काही ठिकाणी अपुरा रस्ता शिल्लक राहात असल्याने सिमेंटचे ब्लॉकच बसवले नाहीत. संगमवाडी येथील बीआरटी मार्गाचे लोखंडी बॅरिकेडिंग नाहीसे झाले आहेत. मार्गाच्या शेवट आणि सुरुवातीचे बॅरिकेडिंग जागेवर असून, मधलेच रेलिंग गायब झाल्याने संभ्रम आहे. यामुळे अपघाताचा धोका संभावतो, असे स्थानिक सांगतात.