जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८०; विलगीकरण कक्षात २९३ जण, २२९ निगेटिव्ह
सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून दाखल करण्यात आलेल्या 3 जणांचा अहवाल करोनाबाधित (कोविड 19) असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 80 झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 9 करोनाग्रस्त (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा रिपोर्ट सकाळी तर एकाचा संध्याकाळी समजला.
सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 21, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 9, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 166, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 21, कोरेगावचे 12 अशा एकूण 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 66, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 75 व बाधित रुग्णांच्या 14 दिवसानंतरचे 10 नमुने अशा एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 90, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 26 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 26 अशा एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.