दोघांचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही
पुणे – शहरात मागील तीन दिवसांत करोनाबाधित 7 रुग्ण आढळून आले. तर रविवारी पुणे शहर 2 आणि बारामती शहरातील एक असे एकूण तीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे यातील दोघांचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. बाधितांची संख्या आणि विषाणूचा प्रसार वाढू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून करोना बाधितांची संख्या आता 27 झाली आहे. त्यातील सात रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर 20 रुग्णांवर नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात आढळलेल्या दोनपैकी एक रुग्ण दुबईहून परतलेला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान रविवारी सापडलेल्या दोन्ही व्यक्तींना बाधा कशी झाली, याची माहिती आरोग्य विभागाकडून तपासली जात आहे. त्यामध्ये या रुग्णांचा बाधित व्यक्तीशी कुठे आणि कसा संबंध आला आहे, तसेच मागील 14 दिवस हे रुग्ण कोठे-कोठे फिरले याची माहिती घेतली जात आहे. त्यातील एकाला सर्दी, ताप अशी लक्षणे असल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी करोनाची तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला तात्काळ नायडू रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, रविवारी दिवसभरात एनआयव्हीकडे सात जणांचे नमुने पाठवण्यात आले आहे, त्यांचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या नायडू रुग्णालयात 15 तर खासगी रुग्णालयात 5 असे एकूण 20 रुग्ण उपचार घेत असल्याचे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.