पुणे – राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, डोंबिवली पाठोपाठ आता सांगली, सातारा याठिकाणीही करोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असून, गेल्या 24 तासांत राज्यात 18 करोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 108 वर पोहोचली आहे.
मंगळवारी दिवसभरात मुंबई येथे 6, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये 4, पुणे येथे 3, सातारामध्ये 2, अहमदनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथे प्रत्येकी 1 असे एकूण 18 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बाधितरुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केलेला आहे. तर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरू देशात प्रवास केला आहे. केवळ दोन व्यक्ती हे पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णांच्या सहवासातील आहेत.
दरम्यान, पुण्यातील आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी एका व्यक्तीवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहे. तो लंडनहून आलेला आहे. तर अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे पुणे शहरातील बाधितांची संख्या 19 झालेली आहे. त्यामध्ये नायडू रुग्णालयात एकूण 16 आणि अन्य तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोन व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून, अन्य व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. दिवसभरात तपासणी करण्यात आलेल्यांपैकी 45 व्यक्तींचे नमुने अहवाल येणेबाकी असून, रात्रीपर्यंत तो अहवाल येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही, हे समाधान आणि आनंदाची बातमी आहे. नागरिकांनी पुढील आदेश येईपर्यंत अशाप्रकारे स्वत:ला घरामध्ये थांबवून घेतले, सुरक्षितता पाळली तर नक्कीच आपण हा प्रादुर्भाव थांबवू. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
परदेशातून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकू नका
काही ठिकाणी परदेशाहून आलेल्या आणि होम क्वारंटाइनमध्ये असणा-या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे अथवा त्यांना सोसायटीमधून निघून जाण्यास सांगणे, अशा घटना घडल्याच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त होत आहेत. परदेशाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाइन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच कोणावरही करोनाच्या भीतीने बहिष्कार टाकण्यात येऊ नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या
पिंपरी-चिंचवड 12, पुणे 19, मुंबई 41, नवी मुंबई 5, कल्याण डोंबिवली 5, नागपूर 4, यवतमाळ 4, सांगली 4, अहमदनगर 3, ठाणे 3, सातारा 2, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण प्रत्येकी 1