जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२२ वर पोहचली
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील तीन जणांचे करोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 122 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या खटाव तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. तर कराड तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संहवासातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
ठाण्यातून खरशिंगे (ता. खटाव) येथे दुचाकीवरून आईवडिलांना घेऊन आलेला 20 वर्षांचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात त्या युवकाला दाखल केले होते. करोनाबाधिताच्या निकट सहवासातील व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारा 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय पुरूष अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 122 झाली असून यापैकी 84 रुग्ण उपचार घेत आहेत. 35 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 29, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 6 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 41, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 21 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 17 अशा एकूण 114 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 52, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 22 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 133, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 7 आणि कोरेगाव येथे 17 अशा एकूण 231 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.