जम्मू – जम्मू – श्रीनगर मार्गावरील एका टोल नाक्या जवळ ट्रक मधून प्रवास करणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांना अडवले गेल्यानंतर पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी तेथे झालेल्या चकमकीनंतर या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले आहे.
दहशतवाद्यांचा हा गट कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसला असावा असा कयास आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की तीन ते चार दहशतवाद्यांचा हा गट एका ट्रकमधून श्रीनगरकडे जात असताना वाटेत एका टोल नाक्या जवळ हा प्रकार घडला. जम्मू शहरापासून सुमारे 28 किमी अंतरावर नागरोता येथे हा बन्न टोल नाका आहे. तेथे सुरूवातीच्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला पण त्याचे अन्य दोन साथीदार तेथून पसार होण्यास यशस्वी झाले. पण नंतर पोलिसांनी नाकाबंदी करून त्यांनाही घेरून त्यांचा खात्मा केला. हे विदेशी दहशतवादी असावेत असा कयास आहे. त्यांची ओळख अजून पटलेली नाही.
पहाटे पाचच्या सुमाराला दहशतवादी आणि जवान यांच्यात ही चकमक झाली. या चकमकीवेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारही जखमी झाला आहे. ट्रक चालकाला अटक करण्यातही पोलिसांना यश आले असून तोही दहशतवादी संघटनांचाच हस्तक असावा असा कयास आहे. या घटनेनंतर आज उधमपुर जिल्ह्यात दक्षतेचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.