सातारा/वाई – पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या निलेश उर्फ गोट्या संजय सोनावणे (रा. वरची आळी, सिध्दनाथवाडी, वाई), मोहम्मद शोएब खलील (रा. फुलेनगर, वाई), विकास उर्फ लाल्या अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई) या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
त्यांच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथे दोन युवक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर वाघ यांनी माहिती मिळालेल्या परिसरात सापळा लावला होता.
दरम्यान माहितीतील वर्णनाची दुचाकी पोलिसांना दिसल्याने त्या दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाठलाग करून दुचाकी थांबवत त्या युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता अजून एक साथीदार शहाबाग फाट्यावर उभा असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी शहाबाग फाट्यावरून तिसऱ्या साथीदारालाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते पिस्तुल वाई येथील एकाला विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. सर्व संशयितांवर वाई पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी वाई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.