न्यूयॉर्क – अमेरिकेत राहणाऱ्या मूळ भारतीय कुटुंबातील तीन जण त्यांच्याच घरातील बॅकयार्ड मध्ये असलेल्या तलावात आज मृतावस्थेत आढळले. ही घटना त्यांच्या न्यूजर्सी येथील घरी घडली आहे. मृतांमध्ये एका आठ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. भारत पटेल वय 62, त्यांची 33 वर्षीय सून निशा पटेल आणि तिची आठ वर्षाची कन्या असे तिघे जण तलावात मृतावस्थेत आढळले.
पुलात अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण तपास अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर हा अंदाज फेटाळून लावला. हा पूल मध्यभागी खूप खोल आहे. या खोलीला घाबरून तिघांचा तेथे बुडून अंत झाला काय याची चौकशी केली जात आहे.
या मागे घातपात असण्याची शक्यता मात्र कमी आहे असे तेथील सूत्रांचे म्हणणे आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, त्या घरातून निशा पटेलचा तलावातूनच आरडाओरडा ऐकू आला होता. त्यामुळे तेथे नेमके काय झाले याचा शोध सुरू आहे. हे घर या कुटुंबाने अलीकडेच विकत घेतले होते.