लोणी काळभोर -चार जणांनी भरदिवसा गोडावूनमधून 3 लाख 5 हजार रुपये किमतीचे साहित्य दमदाटी करून जबरदस्तीने चोरून नेले असल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी फत्तेलाल गणेशलालजी सुतार (वय 28, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली; मूळ रा. हल्दीघाटी, राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष भिसवाल व निखिल माझीरे (दोघे रा. चाकण, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यासह दोघा अनोळखींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदमवाकवस्ती हद्दीत निलेश अरविंद मोरे (रा. बारामती) यांच्या मालकीच्या व्हीएनएस ग्रुप ऑफ कंपनीत ही चोरी झाली आहे.
कंपनीमध्ये 5 कामगार कामास असून सध्या लॉकडाउनमुळे त्यांना काम घरीच दिले आहे. कंपनीमध्ये सुतार हे एकटेच काम करतात. 8 जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास कंपनीचे गोडावूनचे जागा मालक निखिल शिंदे (रा. शेवाळवाडी) यांनी सुतार यांना फोन करून भाड्याने देणे असलेले अर्धे गोडावून पार्टीला दाखवा असे म्हणाले. सुतार त्यांना गोडावून उघडून दाखवले. यावेळी गोडावूनमधील साहित्य सर्वांनी माझिरे यांच्या गाडीत भरले. त्यानंतरच माझिरे व त्यांचे सोबत आलेला एकजण क्रेटा गाडीमधून तर संतोष भिसवाल व त्याचा सोबतचा एकजण हे मोटरसायकलवरून हडपसर बाजूला निघून गेले.
हे साहित्य नेले
1 आय फोन, 7 संगणक, 1 प्रिंटर एम राउटर, 20 की बोर्डचा बॉक्स, 3 एलईडी पॅनल, कॉपर वायरचे 2 रोल, वायर व लॉकची सुटकेस, ऍम्प्लिफायर मशीन, 6 बॅटरी लाईट, 3 मेमरी कार्ड, डायरी, चेकबुक व कागदपत्रांच्या फाईल असे 3 लाख 5 हजारांचे साहित्य नेले.