वरखेड : नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेत सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. नवसाला पावणाऱ्या या ग्रामदैवताच्या यात्रेत शेकडो पालख्या आणि पोतराजांच्या जयघोषाने गाव दुमदुमले. गुरुवारी (दि. १७) यात्रेच्या पहिल्या दिवशी कावडीच्या गंगाजलाने अभिषेक आणि रात्री होमहवन झाले. शुक्रवारी मुख्य दिवशी दुपारी १२:३० वाजता पैठणहून आलेल्या मानाच्या पालखीचे पूजन झाले. गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात महाराष्ट्रभरातून आलेल्या पालख्यांचे ग्रामपंचायत आणि मंदिर समितीने स्वागत केले.
रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह अटळ होता. सुवासिनींनी साडी-खण-नारळाने देवीची ओटी भरली. मात्र, शिरसगाव ते वरखेड रस्त्यावरील खड्डे आणि गावातील अरुंद रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला. भाविकांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची मागणी केली. मंदिर समितीचे सचिव कडुबाळ गोरे, सरपंच विनोद ढोकणे यांच्यासह ग्रामस्थांनी भाविकांचे स्वागत केले. नेवासा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला, तर एसटी आगाराने जादा बसेस आणि वाहनतळ व्यवस्था केली. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दर्शन घेऊन सत्कार स्वीकारला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनाचा ओघ सुरू होता.