वीज कोसळून तिघांचा मृत्यू

धुळे/भिवंडी – राज्यभरात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या धुळे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सांगली, भिवंडीसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यात दोन बालकांचा, तर भिवंडीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची सर्वाधिक गरज होती. त्या भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट असताना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, हिंगोली ही शहरे आणि जिल्ह्यांमध्येही चांगला पाऊस झाला आहे. अंबड, घनसावंगी, बदनापूर या जालन्यातल्या तालुक्‍यातही सरी बरसल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील चार तालुके वगळता उर्वरित ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातही एक दोन तालुके वगळता पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोलीसह वसमत तालुक्‍यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसल्या. उत्तर महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड,येवला या तालूक्‍यात दमदार पावासने हजेरी लावली. विदर्भात काही भागात तुरळक सरी झाल्या आहेत. 

धुळे जिल्ह्यातील पाडळदे येथे झाडावर वीज कोसळून झाडाखाली थांबलेल्या 14 वर्षीय पंकज ज्ञानेश्वर राठोडचा मृत्यू झाला. तर सहा वर्षीय लखन दत्तात्रय राठोड, दहा वर्षीय हितेश संतोष राठोड हे दोन बालके जखमी झाली आहेत. या घटनेत याच झाडाखाली असलेल्या म्हशीचा देखील वीज पडून मृत्यू झाला. तर धुळे जिल्ह्यातीलच शिंदखेडा तालुक्‍यातील खर्दे बुद्रुक येथील 15 वर्षीय दीपाली दगडू गिरासे या मुलीचा देखील वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्वरी रस्त्यावरील झिडके गावाच्या हद्दीतील उंबरपाडा या आदिवासी वस्तीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून शेतात काम करणारी एक महिला मृत झाली असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे. प्रमिला मंगल वाघे ( 20 ) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)