पिंपरी कॅम्पमध्ये राजकीय राडा; राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते यांच्यात सोमवारी (दि.21) जोरदार हाणामारी झाली. या हाणमारीत युतीचे तीनजण जखमी झाले आहेत. या हाणामारीमुळे पिंपरी कॅम्प परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. घटनचे माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरातला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अभिनव कुमार सिंग (वय 30), अनिल पारचा (32, दोघेही रा. पिंपरी) उमाशंकर राजभर (पत्ता माहिती नाही) अशी जखमी झालेल्या युतीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. यातील पारचा हे सेनेचे विभाग प्रमुख असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी आपल्याला युतीच्या कार्यकर्त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप केला. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीगाव येथील विद्यानिकेतन शाळेत सोमवारी सकाळी बोगस मतदान करणाऱ्या 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र हे बोगस मतदार राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप युतीच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर युतीचे कार्यकर्ते परिसरातील मतदानाची माहिती घेत तसेच कुठे कोणी पैसे वाटप करीत आहेत का, याची पाहणी करीत मोटारीतून फिरत होते. त्यांची मोटार माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या घराजवळ आली असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हाणामारीत युतीचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युतीचे कार्यकर्ते भर रस्त्यात मोटार सोडून पळून गेले. जखमी कार्यकर्त्यांवर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर दुसरीकडे आपल्या घरावर युतीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप डब्बू आसवानी यांनी केला आहे. आपले कार्यकर्ते मदतीला आले नसते तर आपल्याला जीवे मारण्याचा कट युतीच्या कार्यकर्त्यांचा होता. युतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पिस्तूल दाखवून धमकावले. तसेच आपल्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोपही आसवानी यांनी केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा डब्बू आसवानी यांच्या घरासमोर घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे युतीच्या कार्यकर्त्यांनी जखमींसह पिंपरी पोलीस चौकीत धाव घेतली. हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र जखमीवर उपचार करा, असा सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे जखमी व्यक्‍तींना प्रथम वायसीएम रुग्णालय त्यानंतर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच युतीच्या कार्यकर्त्यांसाठी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी रुग्णालयात धाव घेतली. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी डब्बू आसवानी यांची भेट घेतली. या घटनेमुळे पिंपरीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. तसेच रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.