पिंपरी : पिंपरीतून पुण्याच्या दिशेने जाताना एच ए कॉलनी जवळील झाड रस्त्यावर पडले. यावेळी तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचा चक्काचूर झाला. यावेळी रिक्षातील चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथून वल्लभ नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एच ए कॉलनी जवळ एक झाड सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर पडले. यावेळी इथून जाणारी एक रिक्षा त्याखाली अडकली. रिक्षातील तिघांना नागरिकांनी बाहेर काढून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या अर्ध्या तासात झाड महामार्गावरून बाजूला केले. या घटनेमुळे मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.