पुणे – बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात यापूर्वी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात दोघांनी विक्रीसाठी मुंबई येथून मेफेड्रॉन मागविला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी दिला.
शम्स महम्मदअली झवेरी (वय 60, रा. मुंबई), हुजेफ रिजाय शेख (वय 21) आणि शोएब जब्बार शेख (वय 21, दोघेही, रा. कोंढवा) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. वडगाव येथील नवले ब्रिजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर झवेरी याला 11 सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासानुसार हुजेफ आणि शोएब या दोघांना अटक करण्यात आली.
झवेरीची पोलीस कोठडी संपल्याने, तर नव्याने अटक केलेल्या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिघांना पोलीस देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. मुंबईतील एका व्यक्तीकडून हा मेफेड्रॉन आणल्याचे झवेरी सांगत आहे. मुंबई येथे तपास करण्यासाठी, नव्याने अटक केलेल्या दोघांनी मेफेड्रॉनचा साठा करून ठेवला आहे का, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.