दागिने, रोकडसह 72 हजारांचा ऐवज लुटला
लोणी काळभोर – घरात कोणी नसल्याची संधी साधून तीन घरफोड्या करून 2 तोळ्याच्या दागिन्यांसह 28 हजार रुपये रोख रक्कम व 4 हजार रुपये किमतीची म्युझिक सिस्टीम, असा एकूण 72 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना वडकी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी राहूल खंडू मोडक (वय 35, रा. वडकी, ता. हवेली) यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्रात फिर्यादी दिली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले जी, मोडक यांच्या आईला शनिवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड येथे जायचे असल्याने त्या पहाटे उठल्या होत्या. दरम्यान, त्यालचा लहान मुलगा अनिल वरील मजल्यावरून खाली आला त्यावेळी त्याला दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. घरांतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी राहुल यांच्याशी संपर्क साधून चोरी झाल्याचे सांगितले.
बेडरूममध्ये असलेल्या कपाटांतील ड्रॉवरमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवलेला स्टीलच्या डबा खाली पडलेला दिसला. यातील 23 हजार रुपये रोकड व सोन्याचे दागिने दिसले नाहीत. राहुल यांना चोरी झाल्याची खात्री पटली. त्यांनी केलेल्या चौकशीत त्यांना घराचे पलीकडे राहात असलेले जालिंदर कोंडीराम आबनावे व पाठीमागे सिद्धार्थनगर परिसरातील उमेश धर्माजी गायकवाड यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्याद देण्यात आली.