पुणे, दि.८ – कोविड सेंटर येथून प्राप्त करून बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणात न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, तपासास सहकार्य करणे, या अटीवर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.
प्रताप सुनील जाधवर (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, ता.मावळ), अजय गुरुदेव मोराळे (वय २५, रा. सांगवी) आणि मुरलीधर सुभाष मारुटकर (वय २४, रा. बाणेर) अशी जामीन मिळालेल्या तिघांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी काम पाहिले. सांगवी पोलिसांनी ९ एप्रिल रोजी काटेपुरम चौक येथे ही कारवाई केली.
कारवाईत तीनरेमडेसिवीर इंजेक्शने जप्त करण्यात आली होती. बाणेर कोविड सेंटर येथून बेकायदेशीर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून ते स्वता:च्या आर्थिक फायद्याकरीता बाजार भावापेक्षा जास्त किंमतीने विकत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयीन कोठडीत असताना तिघांनी ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.