बिबट्याच्या हल्ल्यात तीन बकरे ठार

एकलहरे येथील फकीरवाडी वस्तीवरील घटना
मंचर  – एकलहरे (ता. आंबेगाव) येथील फकिरवाडी वस्तीवरील शेतकरी पोपट शिंदे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर रविवारी (दि. 12) पहाटे बिबट्याने हल्ला करुन तीन बकरे ठार केले. तसेच एक गाभन शेळी जखमी झाली आहे. यामुळे शेतकरी पोपट शिंदे यांचे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्यानंतर आवाज झाल्याने कामगार कृष्णा मलिक जागा झाल्याने त्याने लाईट लावून आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्याने तेथून पलायन केले. गाभण शेळीला बिबट्याने चावा घेतल्याने शेळीच्या गळ्याला जखम झाली आहे. गोठ्याला पाच फूटी तारेची जाळी असतानाही बिबट्याने गोठ्यात प्रवेश करुन शेळ्यांवर हल्ला केला. या घटनेची माहिती पोलीस पाटील सुमन बोंबे यांनी वनअधिकारी यांना कळवली. वनअधिकारी राजू गाढवे, कैलास दाभाडे, वनमजूर कोंडीभाऊ डोके यांनी भेट देऊन पाहणी केली. फकीरवाडी आणि सुलतानपूर या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच उज्वला शिंदे, उपसरपंच स्वप्नील डोके, सदस्य नितीन शिंदे, माजी उपसरपंच नवनाथ शिंदे, जयश्री बांगर, अर्चना डोके, ज्ञानेश्‍वर डोके यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाने शेतकरी पोपट शिंदे यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याची मागणी माजी सभापती उषा कानडे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.