मतपेट्यांभोवती त्रिस्तरीय सुरक्षा कवच

राजगुरूनगरातील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात उद्या मतमोजणी

राजगुरूनगर- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील नऊ उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे. मतपेट्या पोलिसांच्या निगराणीत राजगुरूनगर येथील क्रीडा संकुलात ठेवण्यात आल्या असून केंद्रीय राखीव दलाचे जवान व केंद्रीय रेल्वे सुरक्षा विभागाचे जवान यासह स्थानिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातमतदार 1 लाख 70 हजार 940 पुरुष, तर 1 लाख 56 हजार 318 महिला असे 3 लाख 27 हजार 262 आहे. मतदार आणि इतर चार मतदार आहेत. तर सोमवारी (दि. 21) यापैकी 1 लाख 20 हजार 875 पुरुष, तर 99 हजार 289 महिला मतदार असे 2 लाख 20 हजार 165 म्हणजे 67. 27 टक्‍के मतदान झाले आहे. एकूण 379 केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. सर्वाधिक मतदान दिलीप मोहिते पाटील यांच्या गावातील शेलपिंपळ्गाव केंद्र क्र 305 मतदान केंद्रावर 85.01 टक्‍के तर सर्वाधिक कमी मतदान भीमाशंकर केंद्र क्रं 1 वर 42. 39 टक्‍के मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदानाच्या टक्‍केवारीत शहरीभाग मागे पडला आहे. शहरात मतदारांच्या जवळ मतदान केंद्र असतानाही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी आल्याने सुशिक्षित नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते तर शहरात गेलेले मतदार गावाकडे याचवेळी मतदानाला आले नसल्याने अनेक गावातील मतदानाची टक्‍केवारी घटली आहे.

खेड तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारात मोठी चुरस झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. तर दिलीप मोहिते पाटील, सुरेश गोरे आणि अतुल देशमुख यांनी विजयाचा दावा केला आहे. तालुक्‍यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात होणार आहे त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

  • 29 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
    मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे एकूण 14 टेबल वर 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे एका टेबलावर पोस्टल मतदान मोजणी होणार आहे. जवळपास 150 कर्मचारी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आले आहेत. 24 तारखेला मतमोजणी होणार असल्याने मतपेट्या सुरक्षित स्ट्रॉंग रुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्या ठेवण्यात आलेल्या परिसरात चारही बाजूकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा आमले यांनी दिली.
  • अत्याधुनिक बंदूकधारी जवान तैनात
    केंद्रीय सुरक्षा पथकाचे जवानाची एक टीम, केंद्रीय रेल्वे सुरक्षा पथकाच्या जवानांची फोर्स, खेड पोलिसांची एक टीम मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी तैनात आहे. चारही बाजूने सीसीटीव्ही असून अत्याधुनिक बंदूकधारी जवान तैनात आहेत. क्रीडा संकुल परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)