पूर्व हवेलीतील दुर्दैवी प्रकार
लोणी काळभोर – करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका चोवीस वर्षीय तरुणांसह पूर्व हवेलीमधील तीन जणांना सोमवारी (दि. 27) दिवसभरात प्राण गमवावे लागले आहेत.
उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागील 36 तासांच्या कालावधित करोनाचे बारा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तर, दुसरीकडे पूर्व हवेलीसह पुणे शहरामधील बहुतांश रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळत नसल्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान या पुढील काळात तरी स्वतःसह आपल्या प्रियजनांना करोनापासून वाचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
कदमवाकवस्ती येथील 24 वर्षीय तरुणास चार दिवसांपूर्वी करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने, सुरुवातीला त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी श्वसनाचा त्रास वाढल्याने त्याच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी लोणी काळभोर, शेवाळेवाडी, हडपसर, उरुळी कांचन व पुणे शहरातील विविध सात रुग्णालयांत नेले होते; मात्र या सातही रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने अखेर सासवड परिसरातील एका रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी बेड मिळाला होता.
दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडली. यात त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन येथील 75 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास असल्याचे कळल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुचिता कदम यांनी अनेक हॉस्पिटलना फोन करुन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का, याची विचारणा केली; पण पुणे शहर व पूर्व हवेलीत कुठेही बेड उपलब्ध झाले नाही. शेवटी सासवड येथील एका हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले. परंतु यात त्यांचा मृत्यू झाला.
नायगावातील ज्येष्ठाचा बळी
सोरतापवाडी- नायगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला. त्यांना कुंजीरवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता पेशी कमी झाल्या म्हणून तीन दिवस सलाईन भरले व घरी सोडले. प्रकृती बिघडली म्हणून पुन्हा त्यांना कुजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने तेथून त्वरित कदमवाकस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये व नंतर पुण्यातील ससून हॉस्पिटलला दाखल केले. यात त्यांचा मृत्यू झाला.