लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकाचे बांधकाम सुरू असलेले लिंटर कोसळले. रेल्वे स्थानकाच्या दुमजली इमारतीत लिंटर ओतले जात असताना घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे 35 मजूर गाडले गेले. यात अनेक मजुरांचा मृत्यू होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. कन्नौज रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण केले जात आहे. याच दरम्यान हा अपघात झाला.
रेल्वे, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत 23 कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेतील 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून, आतापर्यंत एकूण 23 कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. स्टेशन परिसरात जवळपास 35 मजूर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आज दुपारी 2 वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.