सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गातील आचरा समुद्र किनाऱ्यावर बोट बुडून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. दरम्यान, तिघांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून जनता जनार्दन मच्छिमार नौका आचरा समुद्रात मासेमारीला गेली होती. या बोटीत चार खलाशी होते. मात्र रात्रीच्या अंधारात दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने बोट दगडाला आपटली आणि जागेवरच बुडाली.
यातून बचावलेला खलाशी पोहून किनाऱ्यावर आला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती तेथील ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बोटीतील तिघाांचा मृत्यू झाला होता.