“वायसीएम’मध्ये तीन दिवस पुरेल

पिंपरी – वायसीएम रुग्णालयात दररोज 40 ते 50 पिशव्या रक्‍त लागते. सध्या येथील रक्‍तपेढीत अवघ्या 120 रक्‍ताच्या पिशव्या शिल्लक राहिल्या आहेत. सध्या एकाही रक्‍तदान शिबिरांची नोंद झालेली नाही. रक्‍तासाठा संपल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सामाजिक संस्थांनी रक्‍तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन वायसीएम रुग्णालयातील रक्‍तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.

करोनाच्या काळात रक्‍ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर करोनाची लस घेतल्यामुळे अनेकजण रक्‍तदान करू शकले नाहीत. याशिवाय दिवाळी निमित्त कामगार आणि विद्यार्थी वर्ग गावी गेला आहे. त्यामुळे रक्‍तदानाचे प्रमाणही घटले आहे.

वायसीएम रुग्णालयात अवघे तीन दिवस पुरेल इतकाच रक्‍तसाठा शिल्लक राहिला आहे. अशीच अवस्था शहरातील इतरही रक्‍तपेढ्यांची झाली आहे. शहरातील रक्‍तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्‍ताचा तुटवडा जाणवत आहे.

प्लेटलेट्‌सचीही मागणी
1 जानेवारी 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत डेंग्यूचे दोन हजार 805 जण संशयित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी 208 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. डेग्यूच्या रुग्णांमुळे प्लेटलेट्‌सची मागणीही वाढत चालली आहे. त्यातच दिवाळीमुळे रक्‍तदान शिबिरांमध्ये खंड पडला आहे. लसीकरणानंतर 14 दिवसांनी रक्‍तदान करता येते. शहरातील 85 टक्‍के नागरिकांनी करोनाचा पहिला डोस घेतला आहे. याचाही थेट परिणाम रक्‍तदानावर झाला आहे.

शस्त्रक्रियांसाठी अधिक रक्‍ताची गरज
काही नागरिकांना करोना संसर्गाची भिती वाटत असल्याने ते रक्‍तदानासाठी पुढे येत नसल्याचे रक्‍तदान चळवळीतील कार्यकर्त्यांना वाटत आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण या शस्त्रक्रियाही वाढत असून त्यासाठी एका रुग्णाला 20 रक्‍त पिशव्यांची गरज भासते. सध्या वायसीएम रुग्णालयात दररोज 40 ते 50 पिशव्या रक्‍त लागत आहे.

रक्‍त उपलब्ध न झाल्यास नातेवाईक रक्‍तपेढीत येऊन वाद घालतात. रक्‍तदान झाल्याशिवाय रक्‍तच उपलब्ध होऊ शकत नाही, हे रक्‍ताच्या पिशव्या मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना पटत नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्‍तदान शिबिर घेण्याची आवश्‍यकता असल्याचे अधोरेखित झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.