तीन दिवस मृतदेह घरातच पडून : शेजाऱ्यांनाही नव्हती कल्पना

पुणे – वाडा संस्कृती लोप पावल्यानंतर शेजारधर्मही लोप पावला आहे. सोसायट्यांच्या बंद दाराआड शेजारी कुणी मेलं तरी कळणार नाही अशी परिस्थिती आहे. याचाच प्रत्यय नुकताच अलंकार पोलिसांना आला. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक मध्यमवर्गीय व्यक्‍ती मरून पडल्यानंतर त्याची माहिती कोणालाही नव्हती. पेपरवाला, दूधवाला, मोलकरीण, वॉचमन, शेजारी या कोणालाही त्याच्या अनुपस्थितीची जाणीव झाली नाही. सोसायटीतील रहिवासी तक्रार कारायला आले तेही सदनिकेतून दुर्गंधी येत असल्याची, पण माणूस उत्तर देत नाही म्हणून नव्हे.

निरंजन माधव बोडस (49) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. ही घटना कर्वेनगर येथील मेघना सोसायटीमध्ये घडली. यासंदर्भात सविस्तर असे की, कर्वेनगर येथील मेघना सोसायटीमधील नागरिकाने अलंकार पोलीस चौकीत येऊन वरच्या मजल्यावरून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच पोलीस कर्मचारी तातडीने तेथे गेले.

बंद दरवाजा ठोठावूनही उघडला न गेल्याने त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच आतील दुश्‍य अतिशय करुणाजनक होते. नितीन बोडस हे गृहस्थ मृतावस्थेत हॉलमध्ये पडले होते. त्यांचे शरीर पूर्णपणे सुजलेल्या अवस्थेत होते. याचा अर्थ त्यांचा मृत्यू होऊन 2 ते 3 दिवस झाले असावेत. पोलिसांनी तातडीने 108 क्रमांकाला कॉल करून रुग्णवाहिका मागवली.

रुग्णवाहिकेतील डॉक्‍टरांनी तापसणीअंती बोडस यांना मृत घोषित केले. शरीराची दुर्गंधी व वाईट अवस्था यामुळे एकही शेजारी किंवा सोसायटीतील सदस्य पोलिसांच्या मदतीस आला नाही. शेजारच्यांना बोडस यांच्या नातेवाईकांबद्दलही काही माहीत नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांचे बॅंक खाते असलेल्या कॉसमॉस बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या भावाचा क्रमांक मिळवला. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यापलिकडे जाऊन काम केले, मात्र शेजारधर्म म्हणून आपण आपल्या कर्तव्याला जागलो का? माणूसकीला चुकलो तर नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. उच्चभ्रू सोसायटीत रहाणारा एक मध्यमवर्गीय माणूस घरात मरुन पडला, तरी कुणाला माहिती लागली नाही. त्याला कोणी फोन केला नाही, का त्याची कोणी आठवण काढत मित्र वा नातेवाईक घरी आला नाही. पांढरपेशा समाजाची ही शोकांतिका विचार करणारी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)