पुणे – शहरामध्ये थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग आखण्याच्या प्रस्तावाला “ग्रीन सिग्नल’ मिळाला असून, पालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात रस्ते ओलांडणे सोपे जावे, यासाठी त्रिमितीय झेब्रा क्रॉसिंग तयार करण्याचा प्रस्ताव मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.
वाहतूक शाखेचे येरवडा येथील मुख्यालयाच्या आवारात आणि बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) समोरील रस्त्यावर “थ्रीडी थर्मोप्लॅस्टिक पेंट’ झेब्रा क्रॉसिंगची प्रायोगिक तत्वावर आखणी केली होती. याबाबतचे वृत्त दै.”प्रभात’ने सर्वांत आधी प्रकाशित केले होते.
वाहतूक विभाग-पालिकेच्या रचनांमध्ये फरक
शहरात थ्री-डी झेब्रा आखण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने मागील काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, महापालिका आणि वाहतूक विभागाच्या रचनेमध्ये फरक असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेचे थ्रीडी क्रॉसिंग पांढऱ्या ठोकळ्यांप्रमाणे दिसते. तर महापालिकेच्या थ्रीडी क्रॉसिंगच्या आखणीमध्ये पांढरा, निळा आणि पिवळ्या रंगाचा वापर केला आहे. दोन्ही यंत्रणांच्या रचनांमध्ये फरक असल्याने रस्त्यावर नेमके कोणते “क्रॉसिंग’ दिसणार, हा विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.
काय आहे “थ्री-डी क्रॉसिंग’?
“थ्री-डी झेब्रा क्रॉसिंग’ हा “ऑप्टिकल’ भ्रम आहे. यामुळे वाहनचालकांना रस्त्यावर बॉक्स असल्यासारखे वाटणार आहे. परिणामी वाहनचालकांकडून जंक्शनजवळ वेग कमी होणार आहे. वाहनांचा वेग कमी झाल्याने अपघातांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. पादचाऱ्यांना देखील सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. प्रामुख्याने युरोपियन देशांमध्ये “थ्री-डी’ तंत्रज्ञानाचा वापर करुन झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहेत. याच धर्तीवर दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथील प्रमुख रस्त्यांवर आखणी केली होती.