नगर- भाडोत्री म्हणून घेतलेली तब्बल सोळा वाहने गायब करणार्या ठगाला अटक करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यु, इनोव्हा, स्पॉर्पिओसह तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची ही वाहने असून, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महाठगास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने फसवणुकीच्या त्यास अटक केली ओ. त्याच्याकडून 16 मोटारकार जप्त करण्यात आल्या आहेत. दादा उर्फ शशिकांत मारूती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता. पारनेर) असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे.
महेश प्रताप खोबरे (वय 40 रा . बी – , गगन रेनाई सन्स जवळ, धर्मावत पेट्रोल पंप, पिसोळ, जि. पुणे) यांचा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. वरील आरोपीने मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इडिंगा, झेस्ट अशा एकूण 22 कार महाबली एन्टरप्रायजेस नावाने खोबरे यांच्याकडून भाड्याने चालविण्यासाठी घेतलेल्या होत्या. पैकी 9 कार आरोपीने खोबरे यांना परत केल्या.
परंतु, उर्वरित 13 कारचे भाडे व त्या कार खोबरे यांना परत केल्या नाहीत. आरोपी कार देत नसून त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर महेश खोबरे यांनी सुपे पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती.
त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुपे पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा दादा सातपुते याने केला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने वरील आरोपीस भोयरे गांगर्डा येथून अटक केली.
त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. त्याच्याकडून इनोव्हा क्रिस्टा आठ, टाटा झेस्ट कार स्विफ्ट क्युजी, अन्य ट्रॅव्हल्स कंपनीकडून घेतलेल्या एसक्रॉस कार, स्कार्पिओ, इनोव्हा कार, बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू तीन, स्विफ्ट डिझायर, इनोव्हा कार एकूण 2 कोटी 69 00 000 किंमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील एक मोटारकार जप्त केली.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, कर्मचारी सुरेश माळी, रवी सोनटक्के, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवींद्र घुगासे, मयूर गायकवाड, रोहीत येमूल, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, संदीप घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.