कोयना पर्यटनाच्या विकासासाठी तीन कोटींचा निधी मंजूर

सणबूर – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याकरीता कोयना पर्यटनाचा संपूर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. त्यानुसार कोयना पर्यटनाच्या कामास शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन सुमारे 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याकरीता शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी होती. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन कोयना दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे पर्यटनाच्या निधीसंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोयना विश्रामगृहाच्या बांधकामाकरीता 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यात नेहरु उद्यानाचे सुशोभीकरण व नुतनीकरण, कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभीकरण व नुतनीकरण, कोयना धरण व्यवस्थापनाचे जिर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था व कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था या कामाकरीता एकूण 2 कोटी 5 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडे मंजूर करुन तो कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे वर्गही करण्यात आला आहे.

या कामांना सुरुवात झाली असून आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोयनानगर येथे वॉटर पार्क उभारण्याकरीता 1 कोटी, ओझर्डे धबधबा सुशोभीकरण 1.50 कोटी व अंबाखेळती देवी मंदीर बोपोली येथील परिसर सुशोभीकरण 50 लक्ष असे एकूण तिसऱ्या टप्प्यात एकूण 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यातील बहुतांशी कामांना राज्य शासनाने जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्‍यक असणारा निधी मंजूर करुन कोयना पर्यटनाला चालना देण्याचे काम केले आहे. या निधीमुळे कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून त्यामुळे कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)