सातारा (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या आतापर्यंत 1744 झाली आहे.
करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला अपयश येत असले, तरी गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना गोळेश्वर, ता. कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोनवडी, ता. फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, शिवथर, ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, अशा एकूण तीन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली.
विशेष म्हणजे, जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.