मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथे करोनाबाधित तीन रुग्ण, नारोडी येथे तीन रुग्ण आणि महाळुंगे पडवळ येथे एक असे एकूण सात करोनाबाधित रुग्ण शुक्रवारी (दि. 3) सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे.
मंचर येथे 63, 34 आणि 20 वर्षीय एकूण 3 महिला, नारोडी येथे 1 पुरुष 69 वर्ष, 2 महिला (एक 52 व दुसरी 82 वर्षीय), तर महाळुंगे पडवळ येथे 40 वर्षीय 1 पुरुष करोनाबाधित आहेत. संशयित 66 रुग्णांपैकी 1 रिपोर्ट बाकी असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले. पंचायत समिती आरोग्य विभाग आणि ग्रामस्तरीय समिती यांनी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मंचर, नारोडी आणि महाळुंगे पडवळ येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, तसेच परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. ज्या बिल्डिंगमध्ये रुग्ण सापडेल, ती बिल्डिंग आणि परिसरातील रस्ता प्रशासनाने बंद केला आहे. तेथे पोलीस कार्यरत आहेत. सध्या तालुक्यात 59 बाधित व्यक्तींपैकी 47 रुग्ण बरे झाले असून दोन मयत आहे. एकूण 10 रुग्णांपैकी भीमाशंकर हॉस्पिटल, मंचर येथे 9 आणि पुणे रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
मंचर शहर आठ दिवस बंद राहणार
मंचर शहरातील सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळता रविवार (दि. 5) ते रविवार (दि. 12) रात्री 12 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहेत, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले. किराणा मालाची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत, दूध विक्री सकाळी आठ ते नऊ आणि संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत चालू राहील. शेतकऱ्यांनी शेतीमाल विविध सोसायट्यांमध्ये जाऊन विकावा. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह इतर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. यावेळी नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावूनच बाहेर पडावे. मास्क न लावता बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.