शिक्रापूर- मुखई (ता. शिरूर) येथे प्लंबिंग व्यावसायिकास काम करण्यासाठी दोन बांधकाम ठेकेदारांसह एका महिलेने जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दांपत्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय सोनवणे (वय 30, रा. इंदिरानगर कॉलनी, मुखई, ता. शिरूर, मूळ रा. शेलू, ता. खेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकनाथ राजाराम चव्हाण, मुक्ता एकनाथ चव्हाण, बाळासाहेब बाबुराव मोहिते (रा. मुखई, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदा कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
मुखई येथील किरण सोनवणे यांनी हे प्लबिंग व्यावसायिक असून त्यांनी बांधकाम ठेकेदार एकनाथ चव्हाण व बाळासाहेब मोहिते यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचा संपूर्ण मोबदला न देता काही रक्कम देऊन सोनवणे यांना कामाच्या मोबदल्या बदल्यात कामाचे काही साहित्य दिले होते.
चार दिवसांपूर्वी सोनवणे हे मुखई बसस्थानकाजवळ असताना चव्हाण व मोहिते तेथे आले. सोनवणे यांना एका साईटवर काम करण्यास सांगितले. यावेळी सोनवणे यांनी कामाच्या मोबदल्याची विचारणा केली. त्यांना दमदाटी करत पैसे मिळणार नाही, असे सांगितले, त्यावेळी सोनवणे यांनी मी काम करू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी दोघांनी सोनवणे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी काही नागरिकांनी सोनवणे यांची सुटका केली. त्याचवेळी एकनाथ चव्हाण यांची पत्नी मुक्ता चव्हाण हिने सोनवणे यांना मारहाण केली. तिघांनी सोनवणे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा करीत आहेत.