पुणे – शहरातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात महिला व तरुणीवर बलात्कार झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या तिन्ही घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींनी बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली. त्यावरून प्रबोधन मोरे (रा. कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचा मोरे हा मित्र आहे. त्यामुळे मित्राला भेटण्याच्या निमित्ताने मोरे फिर्यादीच्या घरी ये-जा करत होता. दरम्यान, त्याने फिर्यादीच्या पतीला व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. हा प्रकार 4 मे ते 4 जून या कालावधीत घडला.
वारजे-माळवाडी येथे 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून तेजस हिवाळे (23) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तेजस व संबंधित तरुणी एकमेकांच्या ओळखीतील होते. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. हा प्रकार 29 जानेवारी ते 21 मार्च या कालावधीत रामनगर येथे घडला.
दरम्यान, तिसऱ्या घटनेत 36 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संदीप लहू शिंदे (25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच, फिर्यादीकडून सातत्याने पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते मार्च 2020 या कालावधीत घडला.