आ. मकरंद पाटील, मदन भोसलेंसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात
वाई – विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुरुषोत्तम बाजीराव जाधव, संतोष उतेकर व प्रमोद विठ्ठल जाधव या तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील व भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांच्यासह दहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत.
राष्ट्रवादीचे आ. मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील, किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे उमेदवार मदन प्रतापराव भोसले, बसपचे दीपक केशव काकडे, भाकपचे धनराज मारूती कांबळे, हिंदू महासभेचे ऍड. दत्तात्रय आबाजी सणस, वंचित बहुजन आघाडीचे रामदास भिवा महानवर, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सचिन भाऊसाहेब चव्हाण, अपक्ष प्रशांत प्रतापराव जगताप, मनोहर बाळासाहेब कदम, श्रीरंग नवसू लाखे हे उमेदवार रिंगणात
आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर म्हणाल्या, उमेदवारांची बैठक घेऊन निवडणूक व प्रचाराविषयी सूचना करण्यात आल्या. उमेदवारांनी दि. 9, 13 व 18 रोजी निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक खर्च निरीक्षकाकडे सादर करायचा आहे.
दि. 10 व 11 ऑक्टोबर रोजी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे आणि दि. 12 व 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. 15, 16 व दि. 20 रोजी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नायगाव येथे सखी मतदान केंद्र तर यशवंतनगर हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे. दि. 21 रोजी 448 मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले व अधिकारी उपस्थित होते.