एकनाथ खडसे यांना संधी देण्यात येण्याची शक्यता
मुंबई : एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तीन जणांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचे म्हटले जात आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले आहे. एकनाथ खडसे, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते.
मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
दरम्यान, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार, तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.