मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीच्या फेरीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या चौकशीत आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही नावं उघड होत आहेत. एनसीबी लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांच्या हवाल्याने एका वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या 3 बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत.
एनसीबी सर्व अभिनेत्रींच्या जप्त केलेल्या फोनमधील डिलीट डाटा पुन्हा मिळवत आहे. या तपासात बॉलिवूडमधील काही मोठे अभिनेत्यांची नावं समोर येत असल्याने जप्त केलेल्या या फोनमधील डाटा महत्त्वाचा ठरणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या फोनमध्ये याबाबत महत्त्वाचे पुरावे मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एनसीबीला संशयित अभिनेत्यांविरोधात पुरावे सापडल्यास त्यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनसीबी आपल्या रडारवरील या अभिनेत्यांना केव्हा समन्स पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे कलाकार या अभिनेत्रींसोबत पार्टीत सहभागी झाले होते. जर या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे हाती लागले तर एनसीबी या अभिनेत्यांना देखील समन्स पाठवण्याची शक्यता आहे.
असं असलं तरी एनसीबी या अभिनेत्यांना समन्स पाठवण्याआधी त्यांच्याविरोधातील पुरावे जमा करण्यावर भर देत आहे. एनसीबीच्या प्रमुखांनी याआधीच पुरावे असल्याशिवाय एनसीबी कुणालाही समन्स पाठवणार नाही, असे म्हटले आहे.