तीन विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविणार – शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

शिरुर – आंबेगाव, खेड, जुन्नर या तीन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकविणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत मला कोणाला दोष द्यायचा नसून आगामी काळात पक्षात नवचैतन्य निर्माण होण्यासाठी पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात येतील व पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिरुर लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिरुरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना व भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुक विकासाच्या मुद्दयावर झालीच नाही. दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी सर्वाधिक निधी दिला होता. तसेच मतदारसंघात 15 वर्षात कित्येक कोटींची अनेक विकासकामे केली होती. तरीही राष्ट्रवादीने प्रचारात अनेक खोटे आरोप केले. कपटनितीचा वापर केला. त्यांच्या याच कपटनितीला मी बळी पडलो.

जातीचे समीकरण व संभाजी महाराजांची मालिका या दोन विषयांचा निवडणुकीत मोठा फटका बसला. नियोजनात त्रुटी राहिल्या असतील, कार्यकर्त्यांना बळ देण्यास मी कमी पडलो असेल तर कोणाला दोष देणे हे संयुक्तिक वाटत नाही. पराभवाला कवटाळून बसण्यापेक्षा पक्ष कसा वाढवता येईल यावर भर देणार आहे. जातीचे राजकारण मी 15 वर्षात कधीच केले नाही व माझ्या पक्षानेही कधीच केले नाही. माझ्यावर जातीचे राजकारण केले असा जो आरोप केला तो विरोधकांचा कट होता व त्यांच्या जाळ्यात मी अडकलो. माझ्या विधानाचा विपर्यास करुन कपटनितीने प्रचारात त्याचा वापर केला गेला. विरोधकांनी जातीचे राजकारण केले. शिरुर लोकसभा मतदार संघात 32 जि. प. गट व 64 पं. स. गण आहेत. या प्रत्येक पंचायत समिती गणात जरी 500 मतांचं लिड मिळाले असती तरी विजयी झालो असतो, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी टोकाला गेलेले मतभेद विसरुन एकदिलाने व जोमाने काम केले असे सांगत भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आढळराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समितीचे सदस्य सुभाष पोकळे, शिरुर नगरपरिषदेच्या नगरसेविका अंजली थोरात, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, तालुकाध्यक्ष पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, शेतकरी सेनेचे माजी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, उपशहरप्रमुख मयुर थोरात, शिवसेना महिला आघाडीच्या विजया टेमगिरे, अनघा पाठक, शैलजा दुर्गे, बलराज मल्लाव, युवा सेनेचे रामभाउ देवकर, विजय नरके, निलेश नवले, हुसेन शहा, बाबुराव पाचंगे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.