पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या बुकीसह तिघांना अटक

कोल्हापूर – प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलीस पथकावर हल्ला करून फरार झालेला मटका बुकी सलीम मुल्ला, त्याचा भाऊ फिरोज मुल्ला व येडगे नामक साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जयसिंगपूर मिरज रोडवर रविवारी दुपारी पकडले. गेल्या सोमवारी यादव नगर येथे नगरसेविका शमा मुल्लाचा पती सलीम मुल्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला करून पोलीस कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण केली होती. तसेच सर्व्हिस रिव्हॉल्वरही हिसकावून घेतली होती.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सलीम मुल्ला, त्याची पत्नी क्षमा मुल्ला यांच्यासह 40 जणांवर मोका कायद्याची कारवाई केली होती. फरारी सलीम मुल्ला अटक झाल्याने त्याच्या साथीदारांची आता धाबे दणाणले आहेत.
मटका बुकी सलीम मुल्ला व त्याच्या भावांची यादवनगर, पांजरपोळ, उद्यमनगर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर परिसरात प्रचंड दहशत आहे. काळ्या धंद्यांच्या साम्राजातून टोळीने साथीदारांची फळी निर्माण केली आहे. या माध्यमातून झटपट कमाईसाठी विविध मार्गांचाही अवलंब केला आहे. सलीम मुल्लावर आजवर 52 गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. राजू मुल्ला (19 गुन्हे), फिरोज मुल्ला (8 गुन्हे) जावेद मुल्लावर (3) गुन्ह्यांच्या पोलीस ठाण्याला नोंदी आहेत. त्यात मटका, खंडणी, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अधिक तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.