वर्गणीसाठी खूनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी (प्रतिनिधी) – वर्गणीसाठी पहारीने मारून व्यापाऱ्यावर खूनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे म्हातोबानगर, वाकड येथे घडली.

सागर राजेंद्र घडसिंग (वय 22), निखील सुभाष डाडर (21), बाबासाहेब संतोष पवार (वय 21, तिघेही रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. मुकेश चौधरी असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. रमेश देवराम चौधरी (वय 32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश यांचे माताजी कलेक्‍शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. तर आरोपी ओमसाई गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आरोपींनी मुकेश यांच्याकडे पाच हजार रुपयांची वर्गणी मागितली.

मात्र आपण एवढी मोठी वर्गणी देण्यास असमर्थ असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यावरून संतालेल्या आरोपी घडसिंग व त्यांच्या साथीदारांनी गुरुवारी पहाटे फिर्यादी मुकेश यांच्या दुकानाची जाळी मोठमोठ्याने वाजविली. मुकेश, त्यांची आई आणि भाऊ हे बाहेर आले असता आम्हाला पाच हजार रुपये वर्गणी का देत नाही, अशी विचारणा आरोपींनी केली. त्यानंतर आरोपी घडसिंग आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी आपसांत संगनमत करून मुकेश यांच्यावर पहारीने खूनी हल्ला केला.

तसेच त्यांच्या आईलाही लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. याप्रकरणी खूनी हल्ला आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घडसिंग आणि त्याचे दोन साथीदार डांगे चौक परिसरात येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीश माने, हवालदार बिभिषण कन्हेरकर, नितीन गेंगजे, विजय गंभीरे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, श्‍याम बाब, प्रमोद कदम यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या. इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश स्वामी करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.