स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; खटाव तालुक्यातील अट्टल चोरट्यांचा समावेश
… असा लागला तपास
मांडवेत दरोडा पडल्यानंतर दरोडेखोर ज्या ज्या मार्गाने पळण्याची शक्यता होती त्या प्रत्येक मार्गावर वडूज, दहिवडी, पुसेगाव, म्हसवड पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मात्र आरोपींनी पळून जाण्यासाठी कोणाताही रस्ता न निवडता माळरानातून पळ काढणे पसंत केले होते. दरोडेखोरांच्या या चकव्यामुळे संशयित हे बाहेरचे नसून आसपासच्या भागातील असण्याच्या शक्यतेला बळ मिळाले होते. त्याच शक्यतेला धरून पोलिसांनी दरोड्याची मोडस व परिसरातील गुन्हेगारांची माहिती गोळा करून संशयितांना अटक केली.एसपींनी सुट्टीही घेतली नाही
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना बऱ्याच दिवसांनी सुट्टी मंजूर झाली होती. त्यामुळे दि.2 रोजी त्या पुण्याला कामानिमित्त जाणार होत्या. मात्र, मांडवेत दरोडा पडल्याची माहिती त्यांना पहाटेच मिळाल्याने त्यांनी पुण्याला न जाता मांडवेत ठाण मांडून अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. एसपींच्या या कृतीमुळे जिल्हा पोलीस दलाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.
सातारा – मांडवे, ता. खटाव येथे 2 जून रोजी पडलेल्या दरोड्यातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या दरोड्यातील सुमारे पाऊण लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, दि. 2 जून 2019 रोजी मांडवे, ता. खटाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी बर्गे यांच्या घरात घुसून सुरा व लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करीत धाडसी दरोडा टाकला होता. त्याच दिवशी मांडवे गावातील अजून काही ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या घटनेने खटाव तालुक्यासह जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच 14 फेब्रुवारी रोजी खटाव तालुक्यातीलच सिद्धेश्वर कुरोली येथील जाधव वस्तीवर मध्यरात्री दरोडा पडला होता.
या दरोड्यामध्ये 39 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवे येथील दरोड्याचा तपास करीत असताना अभिलेखावरील गुन्हेगारांनीच दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दरोड्याची मोडस ऑपरेंटी पाहता आरोपी अंतिम केले होते. तसेच कुरोली व मांडवे येथील दोन्ही दरोडे एकसारख्याच पद्धतीने टाकल्यामुळे दोन्ही दोरड्यातील आरोपी एकच असल्याचे तपासात पुढे आले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस दप्तरी नोंद असलेल्या करण वरिसर्या काळे, त्याचा साथीदार ऋतुराज भावज्या शिंदे रा. काटकरवाडी, ता. खटाव व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी या तिघांनी नागेश सदाशिव भोसले रा. करपडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर हाही या दरोड्यामध्ये सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानुसार सातारा पोलीसांनी नागेश भोसले यालाही ताब्यात घेतले. मात्र, नागेश याचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा 2014 साली दाखल असल्याचे समोर आले.
तेव्हापासून तो फरारी होता. अखेर सातारा पोलिसांनी त्याला करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिला. उर्वरित सर्व संशयित आरोपींनी दोन्ही दरोड्यांची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करून वडूज येथील न्यायालयात हजर केले. खटाव तालुक्यातील मांडवे व सिद्धेश्वर कुरोली या दोन्ही दरोड्यात एकूण सुमारे 84 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, सागर गवसणे, स. फौ. विलास नागे, सुधीर बनकर, आनंदराव भोईटे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन भोसले, प्रवीण फडतरे, योगेश पोळ, राजू ननावरे, वैभव सावंत, संतोष जाधव, विक्रम पिसाळ, अमित माने, स्वप्नील कुंभार, मुनीर मुल्ला, विजय सावंत, मोहन नाचण, प्रवीण कडव, मारुती अडागळे यांच्यासोबत वडूज, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली.